जाणीव एका हळव्या स्पर्शाची

"अग सुनबाई मी वाचून झाल्यावर घडी घालून ठेवलाच होता ग पण अर्णव आला आणि त्याने खेळता खेळता सगळीकडे पसरवला आणि मी आवरणारच होतो इतक्यात तू आलीस... उठवत नाही न आता लवकर म्हणून जरा राहीलच...असू दे मी आवरतो हं".

Oct 4, 2025 - 23:14
Nov 3, 2025 - 22:18
 0  11
जाणीव एका हळव्या स्पर्शाची

 जाणीव एका हळव्या स्पर्शाची...


    "काय हो नाना, काय हा पसारा,  जरा म्हणून शांतता नाही माझ्या जीवाला.. काय हा असा वर्तमानपत्राचा पसारा करून ठेवलायत.. वाचून झाला की जागच्या जागी ठेवायला काय होत तुम्हाला"...

"अग सुनबाई मी वाचून झाल्यावर घडी घालून ठेवलाच होता ग पण अर्णव आला आणि त्याने खेळता खेळता सगळीकडे पसरवला आणि मी आवरणारच होतो इतक्यात तू आलीस... उठवत नाही न आता लवकर म्हणून जरा राहीलच...असू दे मी आवरतो हं"...असं म्हणतं नाना उठण्याचा प्रयत्न करू लागले तितक्यात कविता पुन्हा रागानेच म्हटली "हो आवरतो म्हणे! , असू दया आता,, आणि हा घ्या चहा.. आणि नाना आता वयोमानानुसार जरा कमीच करा हं चहा. त्रास होईल असं काही वागू किंवा करू नये माणसाने या वयात. स्वतःला हीं त्रास आणि दुसऱ्याला हीं"..
 

"अग सुनबाई मी दोनच वेळा तर घेतो चहा.. आणि सवय आहे पूर्वीपासूनची मग नाही होत घेतल्याशिवाय".. . असं म्हणतं नाना पून्हा पुटपुटले,  की, तरी प्रयत्न करीन न घेण्याचा... ते बोलत असतांनाच कविता त्रागा करत त्यांच्या खोलीतून निघून गेली...

 संध्याकाळ झाली होती अमित ची हीं ऑफिस वरून परतण्याची वेळ झाली होती... नाना बैठकीत सोफ्यावर निजले होते... त्यांचा कधी डोळा लागला हे त्यांचं हीं लक्षात आलं नाही... ते तसेच पहुडले होते तितक्यात कविता पुन्हा त्रागा करत ओरडत नानांजवळ येऊन उभी राहिली आणि मोठ्यानेच त्यांना म्हणाली की "नाना!! अहो नाना!! आणि नाना खाडकन जागे झाले तसं ती रागात चिडली अन म्हणाली की "असं वेळी अवेळी झोपत नका जाऊ हो... तिन्हीसांजेची वेळ आहे, लक्ष्मी येण्याची वेळ आणि असं अशुभासारखं झोपलाय काय, चांगल नसतं हे आणि मी नाही हं खपवून घेणार असलं काही... नेहमीचंच आहे तुमचं हे.."

  नाना पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले की,  "अग माफ कर सुनबाई पण केव्हा डोळा लागला कळलंच नाही... हल्ली गोळ्या औषधांच्या वेळा सांभाळता सांभाळता इतर वेळा हरवत चाललोय मी...  असं म्हणतं नाना उठून त्यांच्या खोलीत निघून गेले...

  एव्हाना अमित आलेला होता... त्याने कविताच बोलण ऐकलं हीं होत पण तो तिला काहींच न बोलता सरळ आत निघून गेला... संध्याकाळी सगळे जेवायला बसले... कविताने आज जेवणात पावभाजी बनवली होती जी नानांनी खाल्ली की त्यांना त्रास व्हायचा म्हणून मग ते कविताला म्हणाले की, "जर दूध असेल तर दूध आणि दुपारच्या जेवणातली पोळी असेल शिल्लक तर ती देतेस का मला खायला"? पण कविताने स्पष्ट दूध नाहीये घरात म्हणून सांगितलं आणि आहे ते खा म्हणाली.. . नाना हीं बेताचंच जेवले पण तरीही त्यांना रात्री अस्वस्थता जाणवली आणि पोटात गडबडू लागलं त्यांच्या...

  त्यांना गोळी शिवाय आता आराम मिळणार नव्हता म्हणून ते अमित ला औषधांच्या दुकानातून गोळी आणून दे हे सांगण्यासाठी त्याच्या खोलीजवळ गेले.... ते दार ठोठावणार इतक्यात कविताच बोलण त्यांच्या कानावर आलं... ती अमितला सांगत होती की, "नानांमुळे खूप दमायला होत मला दिवसभर घरात.... सारखा पसारा करून ठेवतात... आणि खाण पिणं चालूच असतं दिवसभर... चहा हीं सारखाच टाकावा लागतो... त्यांच्यामुळे मला अर्णव कडे लक्ष दयायला हीं वेळ भेटत नाही.... अनिल भाऊजीच बर आहे... गेले कायमचेच सगळी नातीगोती सोडून परदेशात... मात्र वाटणीच्या वेळी येऊन उभे राहतील बरोबर आणि आता मात्र आपल्याला सगळा त्रास सहन करावा लागतोय. त्यांचं खाण पिणं, औषधं गोळ्या सगळं आपल्यालाच कराव लागत... . मला तर अगदी नकोसे वाटतात ते पण काय करणार सगळी संपत्ती त्यांच्याच नावावर आहे ना अजून आणि पटकन संपत्ती मुलांच्या नावाने करायची सोडून या वयात कसला एवढा संपत्तीचा हव्यास आहे काय माहित त्यांना....

 कविता अगदी त्रासून बोलत होती आणि विशेष म्हणजे अमित यावर तिला काही न बोलता इतकंच म्हणाला, " की थोडा त्रास सहन करून घे..  वय हीं झालंच आहे त्यांचं... आणि खेकसत नको जाऊस त्यांच्यावर नाहीतर जाईल सगळी संपत्ती हातची".... तेवढ्यात अमित च बोलण मध्येच कातरत कविता म्हणाली की, " हो अरे त्यासाठीच तर सहन करतेय ना सगळं..

 त्या दोघातलं हे संभाषण ऐकून नानांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या... थरथरत्या पायांनी ते माघारी आपल्या खोलीत परतले... त्यांना आज त्यांच्या पत्नीची उणीव अधिक भासू लागली... त्यांच्या फोटोकडे पाहत ते तिच्याशी बोलू लागले की आज तू सोबत असती तर दोघेहीं सोबत राहिलो असतो..

  कुणाला त्रास नसता सहन करावा लागला आपला... तू आयुष्याच्या सगळ्याच वळणावर खूप साथ दिलीस मला पण अखेरच्या या वळणावर मात्र अर्ध्यातूनच सोडून गेलीस... मला न सांगता गेलीस.. सांगितलं असतंस तर दोघेही सोबतच केला असता शेवटचा प्रवास पण तू माझ्या आधी जाण्याचा तुझा हट्ट पुरवलास आणि मला मात्र असं अवहेलणांचं जीवन जगायला सोडून गेलीस...

त्यांच्या डोळ्यातले अश्रू संततधारेसारखे वाहत होते पण ते टिपायला मात्र जवळ कोणीच नव्हतं... नानांना त्यात पोटात हीं दुखतं होत पण ते तसेच पहुडले...
    
 त्यांना झोप येत नव्हती... सारखं मुलगा आणि सुनेचं संभाषण आठवत होत... ते रात्रभर विचारात होते... आणि त्यांनी त्याच रात्री खंबीरपने स्वतःचा निर्णय घेऊन टाकला... दुसऱ्या दिवशी नाना पहाटे लवकर उठले... स्नानादी आटोपून आपली बॅग भरायला घेतली... सगळी आवराआवर करत बसले त्यांच्या खोलीची... अमित नानांना रोजच्यासारखंच न भेटता किंवा त्यांची काहीही विचारपूस न करता ऑफिस ला निघून गेला होता... अर्णव च्या शाळेची वेळ झाली होती म्हणून तो घाईत नानांना रोजच्यासारखं बाय करायला म्हणून त्यांच्या खोलीत आला, तेव्हा नाना बॅग उचलून निघण्याच्याच तयारीत होते. तसं तो नानांना म्हणाला की, " आजोबा एवढ्या सकाळी तुम्ही कुठे निघालात? ते हीं बॅग घेऊन".. "आणि सगळीच खोली आवरलीय तुम्ही तर..सांगा ना आजोबा कुठे निघालात"? तो लडिवाळ हट्ट करू लागला नानांजवळ की "मी हीं येणार तुमच्या सोबत... मला नाही करमणार तुमच्या शिवाय. तुम्ही नसलात तर मला रात्री गोष्टी कोण सांगणार? कोण माझा असा तुमच्या सारखा गोड मित्र होईल? त्यापेक्षा मी येतो तुमच्या सोबत"...

 नानांना नातवाला पाहून, त्याच असं लडिवाळ बोलण ऐकून गहिवरलं पण क्षणात हृदय पाझरण्याआधी नानांनी त्याला जवळ घेत म्हटलं की, "अरे बाळा मी येईन अधून मधून तुला भेटायला...पण आता जाऊ दे मला... अरे मला जरा माझ्या मित्रांची आठवण येतेय म्हणून भेटायला चाललोय त्यांना... येईन लवकरच परत"... असं सांगत नानांनी त्याची पापी घेतली आणि अगदीच घट्ट मिठीत घेतलं त्याला...

 त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहुन अर्णव विचारु लागला "की,तुम्ही का रडताय आजोबा? कोणी रागावलं का तुम्हाला? मला सांगा तसं असेल तर मी बघतोच त्यांना"... त्या नातवाच असं गोड, मधाळं बोलण ऐकून नाना अजूनच गहिवरले... पण मायापाश अजून घट्ट होण्याआधी निघालेल बर म्हणून त्यांनी त्याला शाळेची वेळ झाली जा पटकन असं सांगत पाठवलं...

 अर्णव धावत आईकडे गेला आणि तिला सांगितलं त्याने की आजोबा कुठेतरी निघालेत पण तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल आणि गाडी येईलंच इतक्यात तुझी शाळेची म्हणतं त्याला बूट घातले आणि गाडीजवळ सोडायच म्हणून निघून गेली...

 नांनानीं देवाला नमस्कार केला.. घराकडे हळुवार एक नजर फिरवली.. घराच्या भिंतीवर पोटच्या लेकासारखा मायेन हात फिरवला आणि स्वगत काहीतरी पुटपुटले आणि डोळ्यातली आसवं पुसत दाराच्या दिशेने चालू लागले...  इतक्यात कविता हीं आली अर्णवला सोडवून आणि त्यांची बॅग पाहत "कुठे निघालात? आणि काय भरलंय बॅगेत? इतकं फुगलीय ते" असं म्हणतं तिरक्या डोळ्यांनी बॅगेकडे बघू लागली...

 नानांनी तिला उत्तर देण टाळलं आणि चालू लागले... पुन्हा माघारी वळत तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील काही दिवसातच असं म्हणूनत्यांनी पायात वहाणा घातल्या आणि थरथरत्या हातानी ती बॅग घेऊन चालू लागले... पाय हीं धीर धरतं नव्हते पण उसन अवसान अंगी  एकवटून ते  वाट चालू लागले...

 हळूहळू ते कविताच्या नजरेआड झाले तसं ती नाक मुरडीत, " कुठे जाणार जाऊन जाऊन, येतील परत", म्हणतं आत शिरली...."आपल्याशिवाय आहेच कोण यांना ",असं म्हणतं तरातरा आत निघून गेली... खरं तर तिच्या लक्षात त्या वेळी बऱ्याच गोष्टी आल्या नव्हत्या ज्या तिच्या लक्षात तिचा नवरा म्हणजे अमित आणून देणार होता... तो संध्याकाळी ऑफीस मधून घरी परतला त्यावेळी तिने सगळा वृत्तांत त्याला सांगितला... त्यावेळी त्याला अवघडल्यासारखंच झालं आणि तो तिला रागाने ओरडला की," तुला काही कळतंय का काय झालं आहे ते? नानांना थांब का म्हटली नाहीस? अग तुझ्या लक्षात येतंय का अजून त्यांनी त्यांची प्रॉपर्टीहीं नावावर नाहीये केलेली आपल्या... ते असे रागावून गेले असतील कायमचे तर कस व्हायचं पुढे? कळतंय का तुला".? इतक्यात कविता त्याच बोलण मध्येच थांबवत म्हणाली की," हो अरे माझ्या हे लक्षातच आलं नाही तेव्हा, नाहीतर पाय पकडले असते तेव्हा मी त्यांचे...जाऊच दिलं नसतं त्यांना"...

 "आता असू दे, जे झालं ते, पण आता शोधावं लागेल त्यांना... कुठे गेले ते बघावं लागेल..." म्हणतं अमित बाहेर पडला आणि त्याने  शोधाशोध सुरु केली... पण बरीच शोधाशोध केल्या नंतर हीं त्यांना नाना काही मिळाले नाहीत... पण नानांच्या खोलीत मात्र एक चिट्ठी सापडली होती आणि तिच्यात नानांनी दोनच ओळी लिहिल्या होत्या त्या म्हणजे " शिकवत राहिलो आयुष्यभर शिक्षक म्हणून अख्ख्या जगाला पण स्वतःच घर शिकवण जमलं नाही बहुतेक, आणि आता त्याच घराने मलाच शिकायला लावल आहे या वयात बरंच काही, तेच शिकायला बाहेर पडलोय. तेव्हा तुमची अजून अपूर्ण उत्तर मिळतील तुम्हाला लवकरच"...

 पत्र वाचून दोघांनाही नीट अर्थ लागलाच नाही त्याचा आणि येतील आपोआप परतून, जाऊन जाणार तरी कुठे आहेत.... असं म्हणत ती चिट्ठी तिथेच सोडून दोघेही आपल्या आपल्या कामात मग्न झाले...

 नाना गेल्याच्या काही दिवसातच एका वृद्धाश्रमातून दोन माणसे अमितच्या घरी आली... त्यांनी अमित च्या हातात एक चिट्ठी दिली आणि नानांनी काही कागदपत्रे त्यांच्याजवळ दिली होती ती त्यातल्या एका व्यक्तीने अमितच्या हाती न देता नानांच्या आदेशानुसार त्याला वाचून दाखवली... ती कागदपत्रे म्हणजे नानांच्या प्रॉपर्टी संदर्भातील होती...

 नानांनी त्यांची सगळीच मालमत्ता ते ज्या वृद्धाश्रमात शेवटले काही दिवस राहीले होते त्या वृद्धाश्रमाच्या नावावर केली होती आणि फक्त अमित राहत होता ते घर तेवढं त्यांच्याच नावावर केल होत... असा उल्लेख नानांनी त्यांच्या मृत्युंपत्रात केला होता.

 आता अमित ला नानांचा रागच आला आणि नानांना जाब विचारावा वाटला पण तितक्यात त्याला नानांनी लिहिलेल्या चिट्ठीत अजून काय लिहिलंय या विचाराने ती उघडून पाहावीशी वाटली. म्हणून त्याने चिट्ठी उघडली आणि वाचू लागला.

 नानांनी लिहिलं होत की सगळी माझी संपत्ती मी आज एका वृद्धाश्रमाच्या नावाने केली आहे, हे वाचून तुम्हाला माझा राग हीं आला असेल पण मी माझी खरी संपत्ती तुम्हा दोघ मुलांना समजलो होतो. पण हीं माझी चूक होती. जेव्हा उमगली तेव्हा ती सुधारायचं ठरवलं. आणि तूला प्रश्न हीं पडला नसेल की मी संपत्ती वृदद्धाश्रमालाच का दान स्वरूपात दिली? एवढे दिवस नाना कुठे असतील किंवा आहेत हे हीं पाहवस किंवा शोधावंसं वाटलं नाही तुम्हाला. एवढे दिवस मी ज्या वृद्धाश्रमाच्या नावाने संपत्ती दान केली आहे ना तिकडेच राहिलो. आणि तो वृद्धाश्रम म्हणजे माझ्याच एका विध्यार्थ्याने उभा केला होता. आज तो अगणित आईबाबा सांभाळतो आहे, त्यांची काळजी घेतोय. पोटी जन्म दिलेल्या आईबाबासारखी. पण माझ्या दोन बाळांना एकटा बाप सांभाळणं जमलं नाही. असो, घर तूम्ही राहत आहात तेवढं फक्त तुम्हाला दिलंय, कारण बाप हा क्रूर नसतो. माझा गोड नातू आहे तिथे. त्याला त्या घराची सवय झाली आहे.

 त्यावर मिळालेल्या उत्तराने अमित ढासळला होता आता. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावू लागल्या. आणि तो एका लहान मुलासारखं "नाना ", "नाना" म्हणत हुंदके देऊन रडू लागला. आज त्याला आईची कुशी आणि नानांचा डोक्यावरून प्रेमळ, मायेन फिरणारा हात हवा होता.. तो शोधत राहिला तिथेच नाना अन आईची जागा पण कोपरा अन कोपरा आता सुना झाला होता.. घराच्या भिंती मात्र नाना अन आईच्या स्पर्शापासून पोरक झाल्यामुळे ओलावल्या होत्या आणि एकदम भयाण शांतता, खिन्नता पसरली होती सगळीकडेच...

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2