आई अशी का दिसते ?
आशीष आज एका चांगल्या आय टी कंपनीत काम करत होता.. त्याला एका चांगल्या पगाराची नोकरीं मिळाली होती आणि तो त्याच्या विश्वात मग्न होता... त्याच जग त्याने आखून ही घेतलं होत..... ...................""Selfie with my most beautiful and great mom in the universe ""..........

आई अशी का दिसते ?
आशीष आज एका चांगल्या आय टी कंपनीत काम करत होता.. त्याला एका चांगल्या पगाराची नोकरीं मिळाली होती आणि तो त्याच्या विश्वात मग्न होता... त्याच जग त्याने आखून ही घेतलं होत... स्वतःच्याच विश्वात मग्न राहण्यात आणि अतिहुशारी दाखवण्यात ही तो तसाच पुढे होता.
त्याला वाटतं होत की त्याच्या आयुष्यात सगळं खूप मजेत आणि छान चाललंय आणि काही दिवसात तर त्याची बायको (रेश्मा ) ही माहेराहून आपल्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन परतणार होती त्यामुळे तर तो अधिकच खूष होता...
नेहमीसारखाच त्याच्याच विश्वात,हो,पण त्याला हे ठाऊक नव्हतं की आयुष्य हे फक्त स्वतःच्या सुखापुरतं मर्यादित ठेवायचं नसतं, त्यात दुसऱ्याच्या भावनांची, त्यांच्या मनाची कदर करण ही तेवढंच महत्वाचं असतं...
आशीष ची आई त्याच्यासाठी खूप कष्ठ घेत होती, शेवटी आईच ती. ''जगी न कोणी श्रेष्ठ मातेवीन'' म्हणतात ते काही उगाच नाही... त्याची आई त्याच्या सुखासाठी स्वतःच्या सुखांना मुरड घालत होती हे त्याच्या लक्षात हे आलं नाही कधी किंवा त्याने ते जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही कधी... हवं तेव्हा हवं ते काम आईला सांगायचं, अगदी मोलकरीण समजुन तिच्याशी वागायचं इतकंच त्याला कळत असे...
आई ही आपल्या लाडक्या लेकासाठी सगळं अगदी मनापासून करत असे... तिने खूप कष्टातून त्याला वाढवलं, शिकवलं होत आणि आज तो फक्त तिच्या मुळेच एका चांगल्या पगाराची नोकरीं मिळवू शकला होता पण त्याच्या हे ध्यानीमनी ही नव्हते... त्याला फक्त स्वतःच्या हुशारीमुळे नोकरीं मिळवता आल्याचा गर्व होता आणि तो त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच स्पष्ट शब्दात लिहिल्यासारखा दिसायचा...
आज तर आशीष अजून जास्त खुश होता... आज त्याच दोन महिन्याचं इटुकलं आणि बायको घरी परतणार होते तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर...
आईची ही लगबग, धावपळ सुरु होती. तिने गोडाधोडाच जेवण बनवलं आणि औक्षणाच छान ताट ही सजवलं...
संध्याकाळचे सहा वाजले होते...रेश्मा सोबत तिचे बाबा ही आले होते... आईने दारातच थांबवून "लक्ष्मी आहेस या घरची", म्हणत औक्षण केल. आत आल्यावर दोघ मायलेकाची तीट ही काढली... थोड्यावेळानंतर सगळेच हात पाय धुवून जेवायला बसले... आज सगळ्यांना जरा जास्तीचच जेवण जाणार होत... चिमुकल्या बाळाला पाहून सगळेच आनंदले होते... सगळं कस छान, वाटत होत घरात.
दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्मा चे बाबा परत जायला निघाले... रेश्मा च मन गहिवरून आलं... इतके दिवस त्यांच्यासोबत राहिली आणि आज अचानक माहेराची सगळीच माणसे दिसेनाशी होणार आणि पून्हा कधी भेटतील हे ही ठाऊक नव्हतं म्हणून तिला अजूनच गहिवरलं...
आई ही सुनेच्या मनातलं सार काही क्षणात ओळखून घेई... आईने रेश्मा च्या बाबांना आजच्या दिवस थांबून उद्या जाण्याचा आग्रह धरला आणि ते ही विहीणबाईच्या शब्दाला मान द्यायचं विसरले नाहीत...
रेश्मा चा चेहरा आनंदाने फुलला.. आणि सासूबाईंचे आभार मानायला ती ही विसरली नाही.. दोघेही गालात हसल्या आणि आपआपल्या कामात मग्न झाल्या...
तेवढ्यात आशीष ला अचानक त्याच्या मित्रांचा फोन येऊन गेला की,उद्या आम्ही सारे तूझ्या घरी येतोय... आशिष जरा विचारात पडला त्याला काय कराव कळत नव्हतं पण नाही म्हणणं योग्य नव्हतं म्हणून होकार देऊन तो मोकळा ही झाला...
अखेर दुसरा दिवस उजाडला.... संध्याकाळच्या वेळी त्याच्या मित्रांनी घरी हजेरी लावली... सगळ्यांनी एकच गलका केला... सारे मस्त सोफ्याला टेकून बसले... आणि गप्पा रंगल्या... आशीष ने रेश्मा ची त्यांच्यासोबत ओळख करून दिली... आपल्या बाळाची ही त्यांना भेट घडवली तेवढ्यात रेश्मा चे बाबा ही आलेच मग त्यांची ही ओळख करून दिली... तितक्यात त्यांच्यातील एकजण म्हटला की "अरे आशिष सगळेच भेटले पण आई कुठेय तुझी"? यावर त्याने उत्तर द्दयायला टाळाटाळ केली...आपलं लक्षच नसल्यासारखं भासवून तो दुसरा विषय काढून गप्पा करू लागला...
हे सार रेश्मा पाहत होती... ती काही न बोलता तेथून थेट सासूबाईंच्या खोलीत गेली आणि त्यांना हाताला धरून प्रेमाने सर्वांसमोर घेऊन आली.. आणि "या माझ्या सासूबाई, म्हणजेच आशिष ची आई" अशी त्याच्या मित्रांसोबत ओळख करून दिली... तस आशिषचा रागाचा पारा चढू लागला पण त्याने तसं काही न दाखवता मित्रांना लवकर कटवलं... आणि नंतर आईलाच म्हणाला की "तू अशी समोर येत जाऊ नकोस माझ्या मित्रांच्या मला नाही आवडत ते"... "खूप शरमल्यासारखं होत.. तुझा विद्रुप चेहरा पाहून कसतरीच होत असेल इतरांना हे तूच लक्षात घ्यायला हवंयस आई. त्यात ते हात ही सगळे पोळलेले, कसतरीच दिसत ग आई! आणि त्याच हातांनी चहा पाणी करतेस, किती भयंकर वाटत ते''...तो हे सगळं बोलत असतांनां त्याला जरा ही संकोच वाटतं नव्हता किंवा आपण जे बोलतोय ते चुकीचं आहे हे कळण्याच्या पलीकडे जाऊन तो आईला बोलत होता...
आई बिचारी आतून पार रडवेली झाली आणि हृदयातल्या अश्रूची जागा डोळ्यांनी घ्यायला वेळ लागला नाही... जसे पानावरील दवबिंदू पटापट हवेच्या एका झोक्याने ओघळून पानावरून निसटून जावे तसे तिचे अश्रू ही दवबिंदूनसारखे ओघळू लागले...
जसं कोणी ओल्या जखमेवर मीठ पेरावे आणि त्या मुळे तणासोबत मनाची लाहिलाही होऊन अश्रूचा तोल सुटावा आणि ते गालावरून ओघळत जमिनीला येऊन भिडावे तसेच आईच ही झालं होत... तीच रडू थांबेना आणि व्याही समोर उभे असल्यामुळे ती अधिकच वरमली...
आज आईला जनक कन्येसारखं धरतीत विलीन होता आलं असत तर बर झालं असत असं वाटत होत... पण हे सार सावरून ती आत जायला निघाली तोवर रेश्मा ने सासूबाईचा हात पकडला आणि थांबायला सांगितलं..
आता रेश्मा च्या रागाचा पारा अनावर झाला होता... गरम झालेल्या तव्यावर कोणीतरी पाण्याचे थेंब टाकावे आणि ते ताडताड उडावेत तसं रेश्मा भडकली होती... आजपर्यंत आशीष च वागण तिच्या लक्षात येत होत पण पूरावा म्हणून तिला ते आज खरखूर दिसून आलं...
ती आता आशिषला बोलू लागली, ''का खटकत रे तूला आईचं सर्वांसमोर येणं"? "का वाटावी तूला लाज त्यांच्या चेहऱ्याची"? 'आई आहे ती शोभेची बाहुली नाही'... "तिचा दिखावा करायचा नसतो तर अभिमानाने मिरवायचं असतं तिला"... आणि ज्या चेहऱ्याची तूला लाज वाटते तो चेहरा असा का झाला आहे हे कधी विचारण्याची तसदी तरी घेतलीस का तू आजतागायत? "आपुलकीने आईला विचारलास का की कश्यामुळे असं भाजल आहे तुझं अंग आणि चेहरा"? "का असा दिसतो तो विद्रुप? एक मुलगा म्हणून तूला हे जमलंच नाही पण आज त्यांच्या या अवस्थेला धीर न देता अजून त्यांना असली वागणूक देऊन एक प्रकारे तुच्छ लेखतोयस तू"....
"अरे, कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतास ना तर कळलं असतं की आई अशी का दिसते आपली?..का चारचोघीणसारखी सुंदर, साजस नाही? पण तूला हे जाणून घेणं कधी महत्वाचं वाटलंच नाही. पण आज मी सांगते तूला नीट ऐकून घे की काय घडलंय आईच्या बाबतीत. आणि जे काही घडलंय त्याला तू आणि तूच जबाबदार आहेस म्हणून नीट ऐक"...
"अरे, तू अगदी लहान असतांनां म्हणजे अगदी तीन वर्षाचा असशील तेव्हा तु चालू दिव्याला धक्का दिलास आणि तो खाली पडला आणि त्याने पेट घ्यायला सुरुवात केली. घरात फक्त तू आणि आई... पाहता पाहता सगळीकडे आगीने तिची जागा बळकवायला सुरुवात केली... क्षणात या माऊलीने कसलाही विचार न करता तूला भाजू नये म्हणून कवेत घेतलं आणि तुला घट्ट लपेटून त्या अगीच्या ज्वालांमधून सुखरूप सुरक्षित स्थानी सोडल... पण त्या झळा, ती आग तूला पुन्हा तिच्या कवेत तर घेणार नाही ना या भीतीने ही माऊली आग विझवण्याचा तिच्या परीने प्रयत्न करू लागली यात त्या बिचाऱ्या मात्र होरपळल्या त्या आगीत... चेहरा पूर्ण भाजून निघाला.. अंगाची लाही लाही होत होती तरी त्यांच्या विचारात फक्त तू आणि तूच होतास... आणि त्या नंतर जे घडलं ते अजूनच विपरीत आणि असहनीय होत ते म्हणजे तुझे बाबा, ज्यांनी सात जन्माची वचन घेतली होती ते आईंचा असा चेहरा, शरीर पाहून फारकत घेऊन तुम्हाला कायमचंच दुसऱ्या स्त्री सोबत संसार थाटण्यास निघून गेले... ज्यांच्या आधाराची त्या परिस्थितीत सर्वात जास्त गरज होती आईंना तेच त्यांच्याकडे पाठ फिरवून निघून गेले"..
अश्या वेळी त्यांनी स्वतःला सावरत तूझ्या सुखाचा, हिताचा विचार करून तुझी ढाल होऊन उभ्या राहिल्या... दिवसरात्र काबाडकष्ट करून स्वतःच शरीर झीजवलं आणि तूला शिकवलं... शरीरावर इतक्या जखमा असतांनां, त्यात भरीला मनाच्या जखमा, वेदना अधिक तीव्र होत्या... हे सगळं त्यांनी तुझ्याकडे पाहून पचवलं...
"आणि आज तू जे एका चांगल्या ठिकाणी कामाला आहेस किंवा हे जे तुझं देखणं रूप आहे ना ती फक्त आईंची तुझ्यावर असलेली कृपा आहे म्हणून आहे.. नाहीतर तू आज शून्य असतास"..
आणि हो, "तूला प्रश्न नक्कीच पडला असेल की मला हे सगळं कोणी सांगितलं"? पण घाबरू नकोस हे आईंनी मला अजिबातच सांगितलं नाहिये... कारण आई कधीच तिच्या प्रेमाचा, मातृत्वाचा दिखावा करत नाही.. "तीच प्रेम हे निःस्वार्थ आणि खरखूर असतं"...
आता मात्र आशीष पार रडवेला झाला होता.. पश्चातापाची भावना त्याच्या काळजात घर करत होती... पण अजून तरी अश्रूमधून ती ओघळायची तेवढी राहिली होती...
रेश्मा बोलतच होती, "की हे सगळं मला माझ्या आईकडून समजलंय... सुदैवाने दोघीही चांगल्या जिवाभावाच्या सख्या असल्यामुळे आईला हे सार ठाऊक होत आणि तुझ्यासाठी आईने माझी निवड फक्त आईंकडे पाहून केली होती... अश्या मूर्तिमंत स्त्री ची सुन होण्याचं भाग्य माझ्या नशिबात असावं म्हणून आईने मला तुझ्या नावाच्या मंगळसूत्रांत बांधलं... आणि मी ही फक्त आईंकडे पाहूनच, त्यांची ही कहाणी ऐकूनच तुझ्यासोबत लग्नाला होकार दिला होता...
आणि क्षणात ती पुढे म्हणाली "पण आता बस यापुढे नाही जमणार मला तुझ्यासोबत संसार करायला"... आणि तिच्या बाबांकडे वळून म्हणाली, "बर झालं बाबा काल थांबलात तुम्ही", कदाचित परमेश्वराचीच इच्छा होती म्हणून थांबलात तुम्ही आमच्या आग्रहाखातर का होईना... पण बाबा! 'निघूया आता आपण'... मी आलेच तयार होऊन... अश्या व्यक्तीसोबत संसार करण्यात आता मला काही आनंद वाटणार नाही कारण हा आत्ताच मातृदात्या आईसोबत असा वागतोय म्हटल्यावर उद्या माझ्यासोबत असं काही घडलं किंवा अशी वेळ माझ्यावर आली तर तू ही तुझ्या बाबांनी जे केल होत आईंसोबत तेच करून मोकळा होशील किंवा त्याहीपेक्षा भयंकर काहीतरी करशील... त्यापेक्षा मी आत्ताच निर्णय घेणं योग्य ठरेलं... कारण आईंसारखी ममत्वाची भावना किंवा सोसण्याची क्षमता माझ्यात नाहीये...
आशीष काहीतरी बोलणार, इतक्यात मध्येच त्याच बोलण थांबवून रेश्मा म्हणाली की, "आशिष तू काही विचारण्याच्या आत मी तूला स्पष्टच सांगतेय की मी तूला कायमचंच सोडून चाललेय"...
रेश्मा चे बाबा कौतुकाने आपल्या मुलीला न्याहाळत होते... अश्या लेकीला जन्म देऊन आज खऱ्या अर्थी धन्य झाल्यासारखं त्यांना वाटत होत... अभिमानाने त्यांची छाती फुगली होती...
परत ती मागे वळून आईंजवळ गेली आणि त्यांना म्हणाली, "की "हो आई तुम्ही ही माझ्यासोबत येत आहात"... काही दिवस आपण माझ्या माहेरी म्हणजे तुमच्या मैत्रिणीकडे (विहीन ) थांबूया... मी तोपर्यंत जॉब शोधते... मला जॉब मिळताच आपण स्वतंत्र राहू म्हणजे तुम्हाला अवघडल्यासारखं वाटणार नाही अजिबात...तुम्ही फक्त तुमचा हा नातू सांभाळा मी बाकी सगळं सांभाळून घेईल"...आईला सुनेचं हे बोलणं ऐकून खूप गहिवरून आलं आणि त्यांनी तिला गच्च मिठी मारली... रेश्मा ने सासूबाईचें पाणावलेले डोळे पुसले...
आता मात्र आशीषच्या अश्रूचा बांध मोकळा झाला... तो हुंदके देऊन रडू लागला आणि त्याने क्षमा मागितली त्याच्या आईची... तो माफी मागू लागला की "यापुढे मी असा नाही वागणार आई. मला माफ कर"... "मी आयुष्यात आतापर्यंत खूप चुकीचा वागलोय तुझ्याशी आणि तू मात्र माझ्यावर मायेची अखंड धार धरलीस... किती काय लपवून ठेवलस माझ्यापासून... कधी जाणवू ही दिला नाही तू माझ्यासाठी केलेला त्याग... "धन्य आहेस तू"... पण कृपा कर आई कुठेही जाऊ नकोस... मी नाही आता राहू शकणार तुझ्याशिवाय. मला आता तुझी सेवा करायची आहे... सगळी सुख, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत... हवं तर मला शिक्षा कर, रागाव पण कृपा करून जाऊ नकोस माझ्यापासून दूर"...
आईच्या नेत्रात आता आनंदाश्रुंनी दाटी केली. त्यांची संततधार चालूच होती...
शेवटी आईच ती, तिने तिच्या मुलाला कवटाळलं आणि डोक्यावरून मायेन हात फिरवू लागली...
आशीष ने रेश्मा ची ही माफी मागितली आणि पुन्हा असं वागणार नसल्याचं वचन दिल... रेश्माच्या हळव्या मनाच्या कोपऱ्यान गालात स्मित करून आशीष ला माफ ही केल...
आता सगळेच आनंदले... सगळ्यांच्या गालावर आनंदाची कळी उमलू लागली... आशीष ने हा क्षण आईसोबत सेल्फि घेत कॅमेरात कैद केला आणि क्षणाचा विलंब न लावता सोशल मीडियावर पोस्ट ही केला.... खाली टॅगलाईन टाकत. ""Selfie with my most beautiful and great mom in the universe "".....
What's Your Reaction?






