गुढीपाडवा उत्सव विशेष माहिती... (प्रथा आणि महत्व )

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षातील पहिला दिवस.. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा दिवस साजरा केला जातो.. मराठी नवं वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने केली जाते तों दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध पाडवा...

Mar 18, 2026 - 21:16
Mar 18, 2026 - 23:57
 0  20
गुढीपाडवा उत्सव विशेष माहिती... (प्रथा आणि महत्व )

🌼 गुढीपाडवा -- चैत्र शुद्ध पाडवा 🌼


गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षातील पहिला दिवस.. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा दिवस साजरा केला जातो..
मराठी नवं वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने केली जाते तों दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध पाडवा...

समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून या दिवशी घराच्या बाहेर गुढी उभारून नवीन मराठी वर्षाचे स्वागत केले जाते...
या दिवशी लोकांच्या आनंदाला उधाण येत...

नवीन वस्त्रे, नवीन दागिने, साज शृंगार करून बायका या दिवशी गोडाधोडाचा स्वयंपाक करून गुढीला नैवेद्य दाखवतात आणि तिचे पूजन करून नवीन वर्ष सुखासामाधानाचे जावे या साठी प्रार्थना करतात...

गुढी पाडवा का साजरा केला जातो? त्या मागची पार्श्वभूमी, प्रथा समजुन घेणे गरजेचे आहे.....


🌿 गुढीपाडवा विशेष माहिती ---

🏥 आरोग्यदृष्ट्या महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात.
पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.

शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते...


📜 गुढीपाडवा – महाभारतातील उल्लेख

भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे.

महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो.

या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते.

ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात?

सर्वकाही दडलंय या कथांमध्ये, तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहित असायलाच हव्यात.


📖 कथा ---

👑 शालिवाहन शकास सुरुवात

शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय.

शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे.

या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते.


🌍 ब्रम्हदेवाने केली विश्वनिर्मिती

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस.

ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे "सत्य-युगाची" सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात.


🐟 मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म

भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.


🏹 महाभारत कथा

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.


📚 इतर दंतकथा

  • महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात...

  • नारद मुनीना ६० मुलगे झाले. प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्यापताका उभारून आनंदोत्सव साजरा केला, अशी कला आहे. त्या वेळेपासूनच या नवीन संवत्सराचे स्वागत करताना घराबाहेर एक उंच गुढी आकाशात उभारण्याची परंपरा सुरू झाली. बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून तिच्यावर रेशमी वस्त्र आणि चांदीचे, तांब्याचे वा पितळेचे भांडे उपडे ठेवून तिला फुले वाहून काठी घराच्या छपराबाहेर उंच उभारणे म्हणजेच गुढी उभारणे होय. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी सगळे जग निर्माण केले आणि कालगणनाही सुरू केली, अशी श्रद्धा आहे. काही ठिकाणी विशेषत: मराठवाड्यात शेवग्याची लांब काठी आणून तिला तेल लावून पाण्याने न्हाऊ घालावयाचे आणि त्या काठीवर गुढी उभारावयाची अशीही प्रथा असल्याचे सांगतात.

  • महाभारतात एक कथा आहे. चेदी राजा वसू जंगलात गेला आणि त्याने कठोर तप आरंभिले देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वसूला यशोदायी अशी वैजयंतीमाला दिली, तसेच अखंड भ्रमंतीसाठी एक विमान आणि राज्यकारभार सुरू करण्यासाठी राजदंडही दिला या दैवी प्रसादाने वसू आनंदित झाला आणि भारावूनही गेला. त्याने त्या राजदंडाच्या एका टोकाला जरीचे रेशमी वस्त्र ठेवून त्यावर सोन्याचा चंबू बसविला आणि त्याची पूजा केली हेच आजच्या गुढीचे मूळ स्वरूप म्हटले पाहिजे. हा वर्षप्रतिपदेचा उत्सव नव्या वर्षाचा प्रारंभ करणारा असल्यामुळे हा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष आनंदात जाते, अशी समजूत आहे. आपली प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय कालगणना याच दिवसापासून सुरू होते. वर्षातील प्रत्येक अमावास्येस चंद्र-रवि एकत्र येत असतात आणि पौर्णिमेस ते समोरासमोर येतात. चैत्र अमावास्येस चंद्र आणि रवि दोघेही मेष म्हणजे पहिल्या राशीत एकत्र असतात. आपण दिवसाचा प्रारंभ सूर्योदयापासून मानतो.

  • गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाहि तर तो विजयध्वज देखिल आहे. जेव्हा "श्री राम" लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते.

    तसेच, असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.

🎋 गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर गुढी उभारतात.

  • प्रत्येक नव्या संवत्सराचे स्वागत करताना म्हणजे नव्या वर्षाचा आरंभ करताना घराबाहेर पण दारातच बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून त्याच्यावर एक रेशमी वस्त्र (जमल्यास पीतांबर किंवा एक-दोन हात (वार) लांबीचे बाजारात मिळणारे ‘पामरी’ या नावाचे रेशमी वस्त्र) अगदीच काही नाही तरी नवीन रेशमी साडी निऱ्या काढून बांधावी.

  • त्यावर चांदी, तांबे, पितळ यापैकी कोणत्याही एका धातूचे भांडे उपडी ठेवून त्याला फुलांची एक माळ, साखरेच्या बत्ताशांची एक माळ घालून तसेच कडुनिंबाची एक उहाळी बांधून ही काठी घराच्या छपराबाहेर उंच उभारणे म्हणजेच गुढी उभारणे होय.

  • ह्या गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात. अशी गुढी उभारून झाली की, तिला गंध-फुले वाहून तिची पूजा केली जाते, नैवेद्य दाखविला जातो.

  • पूजा करताना प्रथम ‘ब्रह्मध्वजाय नमः’ असे म्हणून मग ‘ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।’ हा मंत्र म्हणावा.

    सध्याच्या परिस्थितीत दारासमोर गुढी उभारण्यात अडचण येईल, असे वाटत नाही. जे लोक मुंबईसारख्या मोठ्या शहरात चाळीत राहातात त्यांच्या घराची प्रवेशव्दारे मधल्या बोळातून असतात. असे लोक खिडकीत गुढी उभारतात. ते तसे चालू ठेवण्यास हरकत नाही. गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे, याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि सन्मानाने उतरविली जावी. आपला दिवस सूर्योद्यापासून सुरु होतो म्हणून गुढी सूर्योद्याच्यावेळीच उभारली जावी तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण १० मिनिटे आधी उतरवावी. आपल्याकडे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट राष्ट्रीय ध्वज असाच सूर्योद्याच्यावेळी उभारुन संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सन्मानाने उतरविली जाते..


📅 पंचांग पूजन

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावीच; शिवाय त्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असे. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता. अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीच सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करुन संवत्सर फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गोडधोड करणे, तो दिवस आनंदात घालविणे असा रिवाज आहे. हा दिवस आनंदात घालविल्यानंतर संपूर्ण वर्ष आनंदी जाते अशी त्यामागची श्रद्धा आहे. आपण मराठी लोकांनी हा दिवस केवळ आनंदाचाच नव्हे, तर अभिमानाचा म्हणूनही साजरा केला पाहिजे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्यापैकी गुढीपाडवा हा एक शुभमूहूर्त मानला जातो. साखरपुडा, विवाह, मुंज, गृहप्रवेश अशा सर्व मंगलकार्यांसाठी हा दिवस प्रशस्त समजतात.

हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो.


🌾 कृषी विषयक महत्त्व

भूमी, सूर्य आणि वर्षा यांच्या सर्जनशील शक्तीशी जोडलेला हा सण आहे.


🤝 सामाजिक महत्त्व

  • पाणपोई लावणे

  • दान करणे

  • सांस्कृतिक कार्यक्रम

  • मिरवणुका

महिला, पुरुष आणि मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतात.


🎉 समारोप

छान श्रीखंड पुरी खाऊ,
सोबतीने सारे राहू,
द्वेष मनातला संपवू,
आनंदाची गुढी उभारू!!!


सर्वांना चैत्र शुद्ध पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा..
नवीन मराठी वर्ष सुख, समाधान देणारे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना... 🌸

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1