गणेशोत्सव-- पार्श्वभूमी - प्रथा परंपरा श्री. गणेशाय नमः

गणेशोत्सव म्हटलं की आनंदाला उधाण येत.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात..

Aug 26, 2025 - 20:28
Aug 27, 2025 - 01:15
 0  21
गणेशोत्सव-- पार्श्वभूमी - प्रथा परंपरा श्री. गणेशाय नमः

गणेशोत्सव--

       पार्श्वभूमी - प्रथा परंपरा

श्री. गणेशाय नमः

गणेशोत्सव म्हटलं की आनंदाला उधाण येत.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.. दहा दिवसांचा हा गणराय घरी येतो आणि सर्व घर हे आनंदाने भरून जात.जिकडे तिकडे जल्लोष, आनंदसोहळा साजरा होतो...

गणपती येतांना खूप सारा आनंद आपल्या सोबत घेऊन येतो आणि आपल्या ओंजळीत हे आनंदाच, सुखसमाधानच दान टाकून पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला जातो. तेव्हा ओघळतात अश्रू आणि नकोसा वाटतो त्याचा परतीचा प्रवास. पण गणराय मी पुन्हा पुढल्या साली येईन असं वचन देऊन निरोप घेतो आपणा सर्वांचा..

असा हा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका गणराय खरं तर रोजच आपल्या सोबत असतो, प्रत्येक सुख दुःखात आपण त्याला आळवतो... प्रथम पूजेचा हा मानकरी दहा दिवसांसाठीच आपल्याकडे का येतो? कश्यामुळे?, कधीपासून? हे सर्व जाणून घेऊया या लेखात..

तर त्या मागची एक दंतकथा पुराणात सांगितली आहे ती अशी की एकदा भगवान वेद व्यास ऋषि हे महाभारत हे महाकाव्य रचत होते, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाला आळवले, त्यांची आराधना केली आणि गणेशाला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्याच्या विनंतीस मान देऊन गणपती बाप्पा ने होकार दिला खरा पण हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला शीन आला, थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचा दाह वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण जवळपास दहा दिवस चालले. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुरु झालेले हे लिखाण अनंत चतुर्दशीला संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. त्याच्या शरीराचा दाह होत होता आणि तो दाह शमविण्यासाठी आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. आणि गणेश पूर्व रूपास प्राप्त झाले.. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. आणि तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा या सृष्टीत रुजली...

ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे..

पण तेव्हा गणपती हा घराघरात फक्त बसवला जात होता.. नंतर त्याला सार्वजनिक रूप देऊन लोकांना एकत्रित आणण्यासाठी समाजसुधारकांनी प्रयत्न केले आणि गणेशोत्सव फक्त घरापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक झाला..

गणेशोत्सव खरे तर दहा दिवसांचा, परंतु काही लोक त्यांच्या पद्धतीने, त्यांना जमेल तस कोणी दीड दिवसाचा, कोणी पाच तर कोणी पूर्ण दहा दिवसासाठी बसवतात. ज्याच्या त्याच्या सोयीने जो तो आपल्या परीने गणेशाला आपल्या घरी स्थापित करून त्याची मनोभावे पूजा, अर्चना करत असतो.. देश, विदेशातही गणपती बाप्पाला मोठ्या भक्तीभावाने पूजल जात. त्याचा दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि मंगलमय वातावरणात गणपतीचे स्वागत करून त्याला विसर्जणाच्या दिवशी निरोप दिला जातो.. निरोप देतांना बऱ्याचदा भक्तांना गहिवरून येत. लहानग्यांना तर बाप्पा जाऊच नये असं वाटत, परंतु बाप्पा ही "पुढल्या वर्षी लवकर येतो" असं सांगून आपल्या घरी रवाना होतो..

असा हा तुमचा आमचा आवडता बाप्पा दरवर्षी परंपरेनुसार येतो आणि मंगलमय वातावरण निर्मिती करून भक्तांना आशीर्वाद देतो..

अश्या या लाडक्या श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो ही श्रीगणेशोत्सवा निमित्त माझी गणेशास प्रार्थना आणि आपणा सर्व भक्तास हार्दिक शुभेच्छा... गणेशोत्सव तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधान नक्कीच निर्माण करेल ही आशा बाळगते...

धन्यवाद

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 3