नरक चतुर्दशी

हिंदू मान्यतेनुसार, जे लोक नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात ते मृत्यूनंतर नरकात जात नाही, आणि त्यांची सर्व पापातून मुक्तता होते.

Oct 19, 2025 - 17:42
Oct 19, 2025 - 19:49
 0  7
नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी

• तिथी-

अश्विन वद्य चतुर्दशी

• इतिहास-- आख्यायिका

नरकासुर राक्षसाचा वध या दिवशी झाला म्हणून साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे -

पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या 

नावाच्या एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘अभ्यंगस्नान’ केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात. संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. हा दिवस ‘छोटी दिवाळी’ म्हणून ओळखला जातो.

नरक चतुर्दशीची कहाणी सांगितली जाते. यानुसार असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतीसपूर (नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडलं त्याने हिसकावून घेतली. तसेच देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णांनी या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. अदितीची मौल्यवान कर्णकुंडलं परत प्राप्त केली. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतिक आहे. त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्या सोळा सहस्र मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदर निर्वाहाचीही सोय केली. यादिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे. नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णांकडे एक वर मागितला की, या तिथीला पहाटे जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते.

लोकांनी दु:ख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळविली म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. आत्ताच्या काळात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगीरी, अस्वच्छता इत्यादी नरकासुर थैमान घालीत आहेत. याचा नायनाट करण्यासाठी पौराणिक काळात भगवान श्रीकृष्ण आले होते, मात्र आता आपल्यालाच श्रीकृष्ण बनून वाईट प्रथांचा नायनाट करायचा आहे. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा याची सुरूवात आपल्या घरापासून केली तर? यंदाच्या नरक चतुर्दशीला असं ठरवून त्याचा वापर रोजच्या जीवनात करूया तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळेल.

अभ्यंगस्नान

दिवाळीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. पहाटे उठून अंगाला तेल व उठणे लावून, मग अंघोळ केली जाते यालाच अभ्यंगस्नान, असे म्हणतात. काही ठिकाणी या दिवशी अंघोळ झाली की घरातील पुरुषांना स्त्रिया कणकेचा दिवा करून ओवाळतात देखील. आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला फार महत्त्व आहे. त्याला गंगा स्नान, थैला स्नान असेही म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने यमाचे भय नाहीसे होते, असे मानले जाते. अभ्यंगस्नान योग्य वेळी केले तर त्याचे विशेष पुण्य प्राप्त होते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच दिवाळी साजरी होते आणि फटाके फोडले जातात.

हिंदू मान्यतेनुसार, जे लोक नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात ते मृत्यूनंतर नरकात जात नाही, आणि त्यांची सर्व पापातून मुक्तता होते. नरक चतुर्दशी त्याच दिवशी किंवा कधीकधी लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी साजरी केले जाते. अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी करावे, नरक चतुर्दशीच्या दिवशी दिव्यांच्या प्रकाशाने अंधार दूर होतो. या दिवशी अभ्यंग स्नान करताना दिवे लावावे. सर्वांगाला सुवासिक तेल आणि उटणे लावून सुवासिक साबणाने अंघोळ केली जाते...

तसेच या दिवशी स्रिया घरातील माणसांना कनकेचे दोन दिवे करून अंघोळ झाल्यावर कुंकू, अक्षत कपाळाला लावून ओवाळतात....

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1