लेक परक्याचं धन
आई बाबा जाऊन जेमतेम वर्ष झालं.. त्यांची आठवण सारखी अश्रुंच्या रूपात दाटून येत होती.. सारखं आठवणीने मन गहिवरून यायचं आणि मग.......

लेक परक्याचं धन
आई बाबा जाऊन जेमतेम वर्ष झालं.. त्यांची आठवण सारखी अश्रुंच्या रूपात दाटून येत होती.. सारखं आठवणीने मन गहिवरून यायचं आणि मग न मागताच अश्रूंचं दान गालावरून ओघळून थेट जमिनीला भिडायचं..
आज जरा जास्तच गहिवरलं म्हणून म्हटलं जरा दादाला भेटून यावं, तेवढंच जरा हलक वाटेल. त्याच्या डोळ्यात कदाचित आईबाबांचं रूप दिसेल.. भराभर सगळं आवरून, निघाले माहेरी.. डोळ्यात आनंदाच्या हलकेच दाटून येत होत्या सरी..आज दादाला कडकडून मिठी मारेल आणि आईबाबांच्या कुशीतल सुख क्षणभर तरी अनुभवेल असं वाटलं होत..
दादाला कुठलीच कल्पना न देता त्याला आनंदाचा धक्काचं देऊया म्हणून अचानकच गेले. म्हटलं असं अचानक, अनपेक्षित आलेलं पाहून दादा चा आनंद गगनात भिडेल.. थेट ढगाशी मस्ती घालून, त्यांना गदागदा हलवून, थेट धरतीच्या मिलनाच आमंत्रणच देईल.. आणि क्षणातं मग सगळीकडे आनंदाच्या सरी जमतील.. त्या आनंदाच्या सरित दादा अन मी चिंब भिजून जाऊ.. आणि आमच्या या गोड चैतन्यरूपी सोहळ्याला नजर ना लागो कुणाची म्हणून वहिणीबाई भाकर, तुकडा ओवाळून टाकेल आमच्यावरून..
गाडी भराभर धाव घेत होती, पण तिच्याही पुढे मन धाव घेत होत.. आणि अनेक गोड विचारात हरखून जात होत..आज ती गर्द हिरवी वनराई, पळणारी झाडे हीं मनाला इतकी सुखावू शकत नव्हती जितकं दादाच्या ओढीने मी हरखून गेले होते...
नेहमी हवाहवासा वाटणारा तो निसर्गरम्य प्रवास आणि त्या गाडीच्या आत शिरून अंगाला अल्लडपणे भिडणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने रोमांचित होणारी मी भानावरच नव्हते... मी शरीराने दादाच्या अन तितक्याच वहिणीच्या ओढीने त्यांच्या घरी पोहचण्याआधी मन कधीच त्याच्याकडे पोहचल होत.. सोफ्यावर मस्त टेकून चहा चा घोट पीत होत..
तितक्यात बालपणीच्याही गोष्टी मनात कालवा करू लागल्या.. मग तर आनंदाला उधाणच आलं.. म्हटलं घरी गेले की छान बालपणीच्या आपल्या वस्तू, खेळणी, सागरगोटे, बाहेर काढू आणि दादासोबत रात्री बसून छान एक एक आठवणींच्या गाठी सोडवत बसू..
आईने जपून ठेवल्यायत की सगळ्या आठवणी आमच्या लहानपणीच्या.. एका छान पितळी कडीच्या डब्यात.. ""खुलं जा सिम सिम"" असं मुद्दाम म्हणतं हळूच तो डबा आम्ही उघडायचो आणि जुनीच पण रोज नव्याने पाहावीशी वाटणारी खेळणी पाहून आनंदाने नाचत, उड्या मारत खेळायचो.. आणि अजूनही तो डब्बा आईने तसाच ठेवला आहे. हो, मागच्या वेळी आईला बर नव्हतं म्हणून भेटायला गेले होते ना तेव्हा बघितला होता की मी तो डब्बा. आणि हा तोच डब्बा ना आई विचारताच आईने हीं हो तोच तुझ्या अन दादाच्या भातुकलीचा डब्बा असं सांगत उघडून दाखवला होता तो.. कित्ती आठवणी दडल्या आहेत त्यात. पण त्या दिवशी दादा घरी नव्हता म्हणून उलगडून पाहतांना फारसा आनंद नव्हता वाटला.. पण आज मात्र नक्की पाहणार... असं म्हणत घर कधी आलं कळलं हीं नाही..
कधी झरझर पायऱ्या चढून दारापाशी पोहचले हे माझं मला हीं कळलं नाही... दाराजवळ आले अन दार ठोटावताच वहिणीबाईंनी दार उघडले.. ओठांवर उसन हसू आणत "आत या", म्हणतं वहिनी मी उंबऱ्यात पाऊल टाकण्याच्या आतच निघून गेली आत.. वाटलं की कदाचित आई करायची नेहमी मी दारात येताच ओवाळणी तसं करायला आत गेली असेल.. म्हटलं भाकर तुकडा ओवाळेल म्हणून क्षणभर थांबली दारातच, पण वहिनी बाहेर आली नाही म्हणून मीच आत शिरले...
"अग्ग बाई"!, हे काय आईच आपुलकीची आठवण देणार घर खूप वेगळं भासत होत.. घराचं रंगरूप खूप पालटल होत.. पण काही न बोलता पटकन हात पाय धुवून घेतले आणि पाणी प्यायचं म्हणून माठाजवळ जाऊ, तितक्यात वहिनी हातात पाण्याची बाटली घेऊन आली.. "अहो वहिनी माठ कुठेय?" विचारताच म्हटली, "हल्ली कुणी माठ वापरत का? फ्रिज च वापरते आता मी".. "अहो वहिनी पण माठातील पाणी चांगल असतं शरीराला".. तितक्यात मध्येच माझं बोलण थांबवत वहिनी म्हणाली, "ताई आम्हाला नाही आवडत अन आई हीं अश्याच सारखं शिकवत असायच्या", म्हणत पुन्हा तिच्या कामात गुंतली.. मला जरा अवघडल्यासारखं वाटलं, पण पुढे काही न बोलता मी हीं बैठकीत जाऊन बसले..
पाहता पाहता संध्याकाळ हीं झाली... आता दादा येईलच म्हणून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले..
म्हटलं आता येताच अगदी आनंदाने नाचेलच मला पाहून.. आणि ताई तू आलीस खूप बर वाटलं असंही म्हणेल, पण तसं काही फारस झालं नाही.. गालात पैसे खर्च करून हसू विकत घेतल्यासारखं हळूच हसला आणि आवरायला गेला हीं..
आताही माझं मन जरा खट्ट झालं, पण दुर्लक्ष करून मी पुन्हा त्या दोघांच्यात मिसळायला गेले.. वहिनी आत जवणाची तयारी करत होती.. म्हटलं काय बनवलं वहिनी जेवणात, तर खिचडी केलीय इतकंच म्हटली. खरं तर आज आईच्या हातच्या थालीपीठाची आठवण येत होती..पण आता आईच नाही तर हट्ट तरी कोण पुरवणार होत म्हणा. म्हणून मग जेवायला बसलो. जेवतांना हीं सगळे अगदी शांत शांत च होते. पूर्वीसारखा गलका, की मस्ती आता जेवतांना उरली नव्हती. मी हीं फार काही न बोलता मुकाट्यानेच जेवले...
जेवण झाली तसं मी वहिनीला म्हटलं की, "वहिनी जरा आमचा तो पितळी भातुकलीचा डबा देता का मला आणून.. त्यात बऱ्याच जुन्या आठवणी आहेत आमच्या.. पाहून जरा बालपण जगायला मिळेल".. तितक्यात वहिनी म्हणाली, ताई!,"आता नाही तो डब्बा अन तुमची भातुकली इथे... तो डबा कधीच कामवालीला देऊन टाकला मी आमच्या अन ती भातुकली हीं तिच्या मुलांना देऊन टाकली खेळायला. अडगळ होत होती नुसतीच. सगळंच खराब सामान काढून टाकलं मी आता.. हल्ली कोण ठेवत असलं काही घरात"...
मी आता खूप हिरमुसले.. आईची आठवण दाटून आली पण तरीही गप्पच राहीले... एव्हाना झोपण्याची वेळ झाली होती.. म्हटलं रात्री उशिरापर्यंत गप्पा करू तर ते हीं नाही झालं.. दादा दमलोय खूप म्हणत आत त्याच्या खोलीत निघून गेला, तसं वहिनी हीं निघाली.. तेवढ्यात मी म्हटलं की, "अहो वहिनी ती आईने बनवलेली तिच्याच साडी ची छान घडी आहे ना ती दया मला पांघरायला.. मी जेव्हाही यायचे तेव्हा तिचं पांघरायचे.. आईने ती माझ्याच साठी जपून ठेवली आहे.. ती पांघरली ना की कस छान आईच्या कुशीत झोपल्यासारखं वाटत.. मायेच्या हळव्या स्पर्शाची उब मिळते तिच्यात.. दया ना मला ती आणून, कुठे ठेवलीय"? तितक्यात वहिनी म्हणाली की, "काय ताई तुम्ही, काय त्या जुन्या साडीच्या घडीच घेऊन बसलायत.. हल्ली नाहीं हो कुणी पांघरत असलं काही.. छान मऊसूत रजया, दुलया आणि ब्लॅंकेट्स वापरतात सगळेच.. मी जुन्या सगळ्या घड्या, गोधड्या पांघरून टाकून दिली आहेत आता, सकाळीच घंटा गाडी येते, तेव्हा टाकून दिलं मी हे सगळं तिच्यात"..." मी पांघरून आणते तुम्हाला दुसरं ", असं म्हणत वहिनी आत गेली पांघरून आणायला.. आता तर मी पुरती हिरमुसले होते... वहिणीने दिलेल्या मऊसूत पण तेवढ्याच कठीण वाटणाऱ्या दुलईत तोंड खुपसूण निपचित पडले... तसं अश्रुंनी डोळ्यात एकच दाटी केली.
त्यांनाही आता व्यक्त होऊन पडायचं होत, अस्थिर झालेलं मन शांत करायचं होत... म्हणून मग बांध फुटावा तसें ते ओघळत राहीले... आज डोळ्यांच्या ओल्या कडानीं कट्टी करत एकमेकांसोबतच मिलन नाकारलं होत... रात्रभर आईबाबांच्या आठवणीत मन खूप खिन्न झालं होत... शोधत राहीले त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा त्यांच्याच घरात पण शोधूनही मिळत नव्हत्या...
या सगळ्या विचारात रात्र कधी ओसरली कळलहीं नाही.... म्हणून उठले आणि "रात गई बात गई", म्हणत पुन्हा माझं पूर्वीच माहेरपण शोधण्यात गुंतले... नाश्ता वगैरे झाल्यावर वहिनीला मदत म्हणून भाजी निवडत बसले... ती निवडून झाल्यावर आत ठेवायला जाणार तसं भिंतीच्या एका कोपऱ्याकडे नजर वळली... मी तसच तिथे जाऊन पाहिलं तर लक्षात आलं की इथे आई बाबांसोबतचा माझा फोटो होता लावलेला.." अरेच्चा!, पण कुठे गेला तो ? दिसत नाही", म्हणून वहिनीला विचारलं तर ती म्हणाली की, "त्या जागेवर तो फार काही शोभून दिसत नव्हता, म्हणून काढून आत अडगळीच काही सामान ठेवतो तिथेच लावलाय... अगदीच टाकून न देता, तिथे अडकवून ठेवला आहे".. मी भाजीच ताट वहिणीच्या हातात देत, धावत त्या अडगळ असलेल्या खोलीकडे धाव घेतली.. कडी उघडून आत शिरले आणि तो फोटो शोधू लागले... एका कोपऱ्यात अडकवला होता तो पण पुढे काही जड सामान ठेवलेल असल्यामुळे पूर्णपणे दिसत हीं नव्हता तो.. म्हणून मी कसतरी आत शिरून, सामान सरकवण्याचा प्रयत्न करू लागले.. बऱ्याच प्रयत्नांनी तिथे ठेवलेला जड पिंप अखेर सरकला, तसा मी पटकन तो फोटो हातात घेतला.. पाहते तर त्याची फ्रेम हीं फुटली होती आणि अस्वच्छ झाला होता.. पुसून सगळी धूळ साफ करून मी तो फोटो उराशी घट्ट लपेटला..
आता मला माझं माहेरपण हरवलंय हे जाणवलं होत.. दादा हीं सकाळी ऑफिस ला निघतांना फार काही बोलला नव्हता... वहिनी हीं तिच्याच कामात गुंतली होती...म्हणून मग मी हीं आता परतीचा प्रवास करायला हवा आता असं ठरवून वहिनीला माझ्या परतीच्या प्रवासाची कल्पना दिली. तसं वहिनी म्हणाली की, "संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचंच आहे आम्हाला तसं सोडू तुम्हाला स्टॉप वरती"... आणि मधेच मला काही वाटू नये म्हणून औपचारिकता पाळत हळूच अगदी शब्दांवर जोर न देता म्हटली की, "थांबला असत्या आजच्या दिवस, कालच आल्या अन लगेच निघालात"... मी म्हटलं, "नको घरी वाट पाहत असतील सगळे... मला काही काम आहेत"... असं म्हणून मी गप्प झाले...
दादाला वहिणीने फोन वरून तो ऑफिस ला असतांनाच सगळी कल्पना दिली होती, हे तो घरी आल्या नंतर त्याच्या वर्तणुकीवरून जाणवलं होतच मला.. त्याने हीं आग्रह केला नाही मला थांब म्हणून... आवरून सगळं मी बाहेर आले.. वहिणीने सांग्रसंगीत ओटी भरली, घरातलीच काढून ठेवलेली एक साडी ओटीत दिली.... मनात आईबाबांची आठवण तरळली.. आईबाबा होते तेव्हा, बाबा मला माझ्या आवडीने साडी घेऊन द्यायचे... पण आतां आईबाबांसोबत आवड निवड हीं हरवली होती माझी, हे लक्षात आलं आणि माझी बॅग उचलली.. तसं दादा ला म्हटलं की, "मला एक वस्तू हवी होती माझ्या हक्काची या घरातली तेवढी देशील"?, दादा ने होकारार्थी मान हलवली, तसं मी आत जाऊन आमच्या तुटलेल्या फ्रेम चा फोटो घेऊन आले.. आणि "हा फोटो हवाय मला आज इथून निघतांना" म्हणताच वहिणीने हीं आनंदाने मान डोलावली.. खऱ्या अर्थी तिच्या विचारातून मी एक अडगळ सोबत घेऊन चालले होते.. परंतु माझ्या विचारातून तो एक स्पर्श होता मायेचा.. तो एक गंध होता आईबाबांच्या जवळच असण्याचा.. तो एक पुरावा होता, आईबाबांच्या माझ्या सोबत सदैव असण्याचा.. तो एक आधार होता, माझ्या दुःख, संकटातला... त्यांच्या फक्त या फोटोकडे एक कटाक्ष टाकला तरी हजारो संकटे मी पळवून लावणार होते, हे गुपित मला ठाऊक होत.
निघतांना दादा म्हटला की, ताई! तू कशी अचानक आलीस, म्हणजे काही काम होत इकडे की सहजच"..?
आता डोळ्यात पुन्हा अश्रू तरळू लागले पण त्यांना आतूनच सक्त ताकीद दिली न ओघळण्याची आणि दादाच बोलण ऐकून न ऐकल्यासारखं केल ... आता कस सांगणार होते दादाला की मी इथे माझं हरवलेलं बालपण अनुभवायला आले होते तुझ्यासोबत, आईबाबांना पहायला आले होते तुझ्या डोळ्यात, माझं माहेरपण जगायला आले होते काही दिवस...
मी बॅग घेऊन फोटो तसाच उराशी कवटाळत बाहेर पडतांना एक नजर घरभर फिरवली.. पण अजूनही माझं माहेर मला दिसून येत नव्हतं..माहेरचा कोपरा अन कोपरा आता परका वाटत होता....हरवलेलं माझं बालपण शोधायला गेले होते पण शोधता शोधता उलट अजून बरच काही हरवलेलं दिसलं. जे पुन्हा कधीही सापडणार नाही असं... आज कळत होत आईबाबा नेहमी का म्हणायचे की,"" लेक परक्याचं धन""...
What's Your Reaction?






